मी असेन तिथे....
मनाच्या अंधारी गुहेत
आठवणींची मशाल घेऊन
तू तुलाच शोधताना
मी असेन तिथे....
विवेक व भावनांच्या द्वंद्वात
घायाळ झालेल्या मनावर
तूच फुंकर घालताना
मी असेन तिथे....
चुकांची बेरीज, नात्यांचे भागाकार
सुखाची वजाबाकी, दुःखाचे गुणाकार
आयुष्याच अवघड गणित अलगद तू सोडवताना
मी असेन तिथे....
भावनांचा पाऊस बरसून गेल्यावर
मनाच्या निरभ्र आकाशात उमटणारे
सप्तरंगी इंद्रधनू तू अनुभवताना
मी असेन तिथे....
अबोलपणे खूप काही बोलेन
तुझ्या मनाचा आरसा बनेन
उचंबळणाऱ्या लाटांचा किनारा असेन
आणि मग....
तुझ तुलाच गवसेल
एक उत्तर, एक अर्थ
जे दडल होतं तुझ्यातच
खरतर सगळं तुझ तूच करणार आहेस,
मी फक्त असेन तिथे....
वसुधा विश्वास गोखले
No comments:
Post a Comment