समुपदेशन कोणासाठी ? कशासाठी ?
समुपदेशन खरतर सर्वांसाठीच.
समुपदेशन म्हणजे काय
? सल्ला देणे,समज देणे,
टीका टिप्पणी करणे, मार्गदर्शन करणे कि मूल्यमापन करणे?
यापैकि काहीच नाही.
तर मग काय?
शरीराला ताप आला तर आपण लगेच औषध घेतो पण मनाच्या तापाकडे मात्र दुर्लक्ष करतो. काट्याचा नायटा कधी होतो हे आपल्याला कळत देखील नाही.
औदासिन्य, नैराश्य, अपराधीपण, चिडचिड,
काळजी अशा नकारात्मक भावना आपली नजर चुकवून कधी आपल्या मनात प्रवेश करतात,
ठाण मांडून बसतात आणि आपल्या मनाचा ताबा घेतात ते आपल्याला जाणवतही नाही.
स्वच्छ, निरभ्र मन झाकोळून जात. काय कराव,
हे आभाळ मोकळ कस कराव उमजत नाही.
जवळची माणस परकी वाटू लागतात,
हा आपलाच गुंता आपणच सोडवण्यासाठी समुपदेशक मदत करतात.
काही समस्या अशा असतात कि काय निर्णय घ्यावा हेच कळत नाही.
जणूकाही तुमच्या समोर चार रस्ते आहेत,
कुठल्याही मार्गाने गेलात तरी काटेकुटे, अडथळ लागणारच असतात. तुम्ही गोंधळता, कुठल्या मार्गाने गेल तर लवकरात लवकर,कमीत कमी त्रास होऊन पण ठरलेल्या मुक्कामावर नक्की पोचू याचा संभ्रम पडतो.
समुपदेशक समस्येच्या बाहेर असल्यामुळे समस्येमुळे निर्माण होणारया भावनिक गुंतागुंतीपासून अलिप्त असतो.
त्याच्याशी चर्चा करून,
साधक बाधक विचार करून आपण अधिक विवेकनिष्ठ निर्णय घेऊ शकतो. पण म्हणून समुपदेशन काय फक्त समस्या आल्यावरच करायचं का?
तर नाही.
सुंदर दिसण्यासाठी आपण प्रयत्नशील असतो, शारीरिक आरोग्य राखण्यासाठी भरपूर मेहेनत घेतो पण मनाच्या आरोग्याविषयी मात्र पूर्ण अनभिज्ञ असतो कारण त्याची जाणीवच नसते.
म्हणूनच समुपदेशनाची व्याप्ती ही फक्त समस्याग्रस्त व्यक्तींसाठी समस्येच्या काळात एवढीच सीमित नाही.
काही समस्या आपल्या वाट्याला येउच नयेत अशी प्रत्येकाची इछ्या असते.
तर काही वेळेस भविष्यात उभ्या ठाकणाऱ्या संभाव्य समस्यांची आपल्याला पूर्वकल्पना असते व त्याना सामोर जाण्यासाठी आधीपासूनच मानसिक,
भावनिक तयारी केली तर तो काळ निभाऊन नेण्यासाठी अधिक समर्थपणे आपण क्रियाशील राहू शकतो.
पण मग त्यासाठी काय प्रतिबंधात्मक पावलं उचलावी हे समुपदेशनाद्वारे समजू शकत.
आपण दैनंदिन जीवन समर्थपणे व्यतीत करत असतो.
पण ते आणखी सुंदर करण्यासाठी स्वतःच्या मनाची ताकद,
क्षमता, प्रतिकारशक्ती कशी वाढवायची हे माहित नसत.
आयुष्याची बांधेसूद आखणी करण्यासाठी समुपदेशक तुम्हाला मदत करू शकतो.
समुपदेशन हि आजच्या काळाची गरज आहे.समुपदेशन हा अनुभव आहे एका नात्याचा. त्यातून काय मिळत?
सुखाची गुरुकिल्ली? तर नाही.
सुखी माणसाचा सदरा हा कुठे विकत मिळत नाही.
तो आपला आपण शिवायचा असतो. खरतर सुख हे आपल्या आतच दडलेल असत. "तुझे आहे तुजपाशी परि तू जागा चुकलाशी". समुपदेशक फक्त तुम्हाला आरसा दाखवतो.
No comments:
Post a Comment