Quote of the week

Wednesday, 12 November 2014

'स्व' चे 'स्व' पासून रक्षण


'स्व' चे 'स्व' पासून रक्षण 

रस्त्यांवर तावातावाने चालणार दोन माणसाचं भांडण कधी ऐकलय ?एखादा अपघात झाला असेल तर चूक कशी सर्वस्वी दुसऱ्याच माणसाची होती व आपणच कसे बरोबर होतो हो एकमेकांना पटवून देताना ते हमरातुमरीवर येतात. पण यातल्या एकाने जरी प्रामाणिकपणे व खुल्या दिलाने स्वत:ची चूक, मग ती कितीही क्षुल्लक असली तरी पट्कन मान्य केली, sorry  म्हटल  तर पुढचा सगळा वादंग टळतो. पण अस क्वचितच होत. अस का?

आपल्याला सर्वात प्रिय काय असत तर आपण 'स्वत:'. आपल एक स्वत:च जग असत ज्याच्या केंद्रस्थानी आपण स्वत: असतो. बाहेरची वस्तुस्थिती काहीही व कशीही असू दे आपण ती आपल्या नजरेने, आपल्या दृष्टीकोनातून बघत असतो. आपल्या सर्वांच्या मनात स्वत:ची एक प्रतिमा असते. आपल्या स्वत:च्या दुनियेत आपण सर्वश्रेष्ठ असतो. आपण अगदी आदर्श असतो, सत्यप्रिय असतो,  आपल कधीच चुकत नसत. आपणच आपल्याला खूप मान देत असतो. आपल्या या स्वप्रतीमेला धक्का लागेल अशी परिस्थिती जराजरी उद्भवली तरी आपण अस्वस्थ , बेचैन होतो व आपल्याही नकळत लगेचच आक्रमक किंवा  रक्षात्मक पवित्र घेतो व या 'स्व' चा बचाव करतो.आणि हा बचाव फक्त इतरांपासूनच नसतो तर कधी कधी तो स्वत:पासूनही असतो.

आपण आपली चूक, आपले दुर्गुण स्वत:पाशी मान्य करण्याऐवजी कशी विविध कारणे देऊन स्वत:लाच मूर्ख बनवत असतो. अगदी परिचयातल उदाहरण म्हणजे वजन कमी करण्यासाठी सकाळी उठून चालायला जायचा आपला उपक्रम दोन दिवसात बारगळतो तेव्हा आपण स्वत:लाच सांगतो कि आदल्या रात्री उशीरा झोपल्याने किंवा काम जास्त झाल्याने दमायला झाल होत त्यामुळे जागच आली नाही. मग सलग काही दिवस अस झालं कि आपण ठरवतो कि ऐवीतैवी खंड पडलाच आहे तर आता पुढच्या महिन्याच्या एक तारखेपासूनच सुरुवात करुया. आणि मग खाण्यापिण्यावरच नियंत्रणही तेव्हाच चालू करु.  आपण जात्याच आळशी आहोत हे आत कुठेतरी माहिती असत पण ही काही सुखद, आत्मसन्मान वाढविणारी भावना नव्हे, ती टोचणी मनाला लागते. मग इथे स्वत:पासून व इतरांपासून बचाव कसा करायचा? तर अशी कारण देऊन, आणि भविष्यातली योजना स्वत:लाच सांगितली  कि 'मी काही टाळत नाहीये पण थोडस पुढे ढकलतेय' कि मग अपराधीपणाच्या भावनेतून सुटका होऊन तात्पुरत बर वाटत.  जिथे गरज आहे तिथे आपण स्वत:शी कठोर नाही वागू शकत. स्वत:ला हा प्रश्न विचारून धारेवर नाही धरू शकत कि कितीही उशीर झाला तरी थकलो तरी जेवायचे टाळतो का? मग हेच टाळतोय कारण मी आळशी आहे.

कधी कधी आपली आपल्यालाच स्वत:च्या चुकांची जाणीव होत असते किंवा आपल्यात असणारी कमतरता, दोष जाणवत असतात. कधी ध्यानी मनी नसताना अशी परिस्थिती निर्माण होते कि स्वत:चाच एखादा अनोळखी पण नकोसा वाटणारा पैलू लख्खकन सामोरा येतो. आपल्या आजूबाजूला आपल्या नजरेसमोर कितीतरी अत्याचार घडताना आपण बघतो. पण त्याविरोधात आवाज उठवत नाही. आपल आपल्यालाच ते खटकत, जाणवत कि आपण अस गप्प राहण बरोबर नाही. पण ही आवाज उठवायची  आपल्यात हिम्मत नाही हे त्याप्रसंगी आपल्याला उमगत. पण ती हिंमत कशी वाढवायची यावर काम करण्याऐवजी या नकारात्मक भावनेपासून आता स्वत:पासूनच स्वत:ला कस वाचावयाच  याचाच विचार आपण करतो. जाणून बुजून नव्हे तर अगदी आपल्याही नकळत. मग आपण आपल्या मनाची समजूत घालतो कि काय फरक पडणार आहे, असे समाजात किती अत्याचार कित्येक लोकांवर होत असतात? आपण फक्त आवाज उठवून काय साध्य होणार आहे. आवाज उठवण म्हणजे नुसताच वांझोटा राग. जाऊ दे मरू दे. नको त्या नसत्या फंदात पडायला. मग हळूहळू आपण त्या संवेदनांना बोथट करुन टाकतो.

कित्येक वेळा हा स्वत:चा बचाव करताना आपण काय काय करु शकतो याची परखडपणे आपल्यापाशीच तपासणी केली तर आपणच आश्चर्यचकित होऊ. ते विचार मनातून झटकून काढून टाकतो. अशा विचारांपासून लांब पाळायला लागतो. दुसरऱ्यांवर दोषारोप करण्यापासून स्वत:शीच खोट बोलण्यापर्यंत सगळ काही आपण करू शकतो. गंमत अशी असते कि हा खेळ आपण आपल्याशीच खेळत असतो आणि याची आपल्याला तसूभरही कल्पना नसते.

एखादी परिचायातील व्यक्ती आपल्या नजरेसमोर यशस्वी होताना आपल्याला दिसत असते. त्यात त्या व्यक्तीच कसब पणाला लागलेले असते. उदाहरणार्थ एखाद्या शेजारणीला ऑफीसमध्ये प्रमोशन मिळाल आणि ती पेढे द्यायला आपल्या घरी आली तर तीच मोकळेपणाने तोंडभरून आपण कौतुक करू शकू का? होत काय कि जर आपण नोकरी करत नसलो तर आपण मनोमन आपली तुलना त्या व्यक्तीशी करतो व आपल्याला जाणवत कि त्या व्यक्तीने जे केल ते आपणही करू शकलो असतो पण आपण नाही केल. आता असा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा आपला न्यूनगंड डोक वर काढतो. ही भावना आपल्याला बचैन करते. मग आपल्याही नकळत आपण आपल समाधान करण्यासाठी तिच्याकडे काय आहे जे आपल्याकडे नाही याचा शोध घेतो आणि एकदा ते मिळाल कि मग आपली त्या न्यूनगंडाच्या भावनेतून सुटका होते. मग आपण त्या व्यक्तीच्या यशाच पूर्ण श्रेय तिला देत नाही. आणि स्वत:ला समजावतो, तिच्याकडे काय कामाला नोकरचाकर आहेत, घरी किती वाजता येते किंवा घरातून किती वाजता जाते हे विचारणार कोणी नाही.म्हणून ती हे साध्य करु शकली.

आपण कोणाकडे सल्ला मागायला गेलो आणि तो माणूस आपल्या चुकांवर बोट ठेवायला लागला तर आपल्याला ते सहन होत नाही. जी माणस आपल्याला आपल्या चूका दाखवतात ती आपल्याला आवडत नाहीत. आपण त्यांच्याकडे परत जाण्याचे टाळतो.

 हा 'स्व'चा बचाव करण्यात आपण कधी यशस्वी होतो तर कधी अयशस्वी. जर या 'स्व'चा बचाव नाही करु शकलो, आपल्या मनातली 'स्व'ची आदर्श प्रतिमा नाही वाचवू शकलो तर मग आपल्याला वास्तवाला सामोर जाव लागत.या खऱ्या 'स्व'चा स्वीकार कारण आपल्याला जड जात.  दु:ख, राग, चिंता, तिरस्कार, न्यूनगंड अशा नकारात्मक भावना आपल्या मनात प्रवेश करतात व आपल मानसिक स्वास्थ्य हरवत आणि मग एक दुष्टचक्र निर्माण होत. आपण स्वत:चा बचाव करु शकत नाही या जाणीवेने एक अपराधीपणाची, कमीपणाची अशा आणखी एका नकारात्मक भावनेची भर पडते. आणि आपण स्वत:चा अजून बचाव करायला जातो. आणि या नकारात्मक भावनांच्या दलदलीत फसत जातो.आणि त्यांचा सामना कसा करायचा, त्याचं नियोजन कस करायचं हे आपल्याला माहिती नसत.

आपला विकास साधायचा असेल तर दुसऱ्यांच एक वेळ सोडून देऊ पण आपण आपल्या स्वत:कडेतरी परखडपणे पहायला शिकूया. या मनाच्या कोर्टात आरोपीही तुम्हीच, वकीलही तुम्हीच व न्यायाधीशही तुम्हीच असता. आरोपीच्या हातून जर खरच गुन्हा घडला असेल, पण सारखच आपल वकिल आरोपीच बचावपत्र घेऊन चुरशीने लढत असेल तर आरोपीवरचा गुन्हा सिद्ध  कसा व्हायचा ? आणि यातून सगळ्यात धोकादायक भाग असा कि वकिलाच्या या युक्तीवाद्पूर्ण बचावात्मक पवित्र्यामुळे उद्या  खरोखरच गुन्हा करणारा आरोपीही असच सतत मानायला लागला कि मी गुन्हा केलेलाच नाहीये तर मग त्याच परिवर्तन कस व्हायचं? त्यामुळे इथे न्यायाधीशाला खूपच सतर्क व नि:पक्षपाती राहावा लागत

आपण या 'स्व'च्या भल्याबुर्या सर्व गुणांसकट 'स्व'चा स्वीकार का करु शकत नाही? माझ्यात चांगलही आहे तसच वाईटही आहे कारण मी माणूस आहे. हे जस आपण स्वीकारु शकत नाही तसच प्रत्येक वेळी दुसऱ्या व्यक्तीचच किंवा परिस्थितीच चुकलेले असते असे नाही तर आपलीही चूक होऊ शकते हेही आपण मान्य करायला तयार नसतो. कारण अस केल्याने आपल्या स्वप्रतीमेला, आत्मसन्मानाला  धक्का लागतो.मीच बरोबर अशी सदैव ताठर भूमिका न बाळगता मीही चुकू शकतो कधी अनवधानाने, कधी जाणून बुजून अशी स्वत:शी तरी कबुली देऊ शकतो का?  कारण अशी कबुली देऊ शकलो तरच पुढे सुधारणेला वाव आहे किंवा त्यासाठी प्रयत्न स्वत:हून करू. आपण सर्वच माणूस आहोत आणि म्हणूनच चुका करताच राहणार याचा स्वीकार होण गरजेच आहे.

'स्व'वर प्रेम जरुर करु या पण आंधळ प्रेम नको तर डोळसपणे. आता हे सर्व वाचून झाल्यावर जर एखादा म्हणाला कि आमच नाही बुवा अस होत तर तोही  एक प्रकारचा बचावच आहे.


  .
   

No comments:

Post a Comment